Untitled 1
महाशिवरात्री २०२१ - अजपा गायत्रीचे षडाक्षर स्वरूप
खरंतर आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने काही लिहावं वगैरे असा अजिबात विचार
नव्हता. काल काही जुन्या स्टुडंटसशी बातचीत झाली आणि त्यांनी आग्रह केला. तरीही
इच्छा झाली नाही पण त्यानंतर मनात विचार रेंगाळत राहिला. लिहिण्याची प्रेरणा काही
केल्या होत नव्हती.
लिहिण्यासारखं तर खुप होतं पण आंतरिक ऊर्मी जाणवत नव्हती. त्यामुळे भगवान शंकरालाच साद घातली. त्याला म्हटलं - "योगीश्रेष्ठा! तूच मला अजपा,
कुंडलिनी, योग वगैरे गोष्टींचे बाळकडू पाजले आहेस. तुझा
खास दिवस आहे तेंव्हा आता तूच माझ्याकडून दोन शब्द लिहवून घे."
आज सकाळी औदुंबराला नमस्कार करत असतांना अचानक ध्यानीमनी
नसतांना "शिव षडाक्षर" मंत्रात गोवलेले अजपा गायत्रीचे महात्म्य
स्पंदनरूपाने तरळून
गेले. श्रीकंठाला जणू सांगायचे होते की आजच्या दिवशी माझ्या प्रिय साधनेचे आणि
माझ्या प्रिय मंत्राचे महात्म्य एकत्रितपणे शब्दबद्ध कर. शिव इच्छेने आणि दत्तात्रेयांच्या साक्षीने जे स्पंद उमटले ते तसेच्या तसे
शब्दरुपात खाली देत आहे -
कोणतीही ध्यानसाधना ही काही एका दिवसांत विकसित होत नाही.
श्रद्धा-सबुरी-शिस्त-समर्पण यांच्या भक्कम बैठकीवर ती हळूहळू आकार घेत असते. आज जे
स्टुडंटस Level 1 ओलांडून Level 2 मध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी विशेष महत्वाचा
दिवस आहे. कारण आता तुमच्या साधनेत अमुलाग्र बदल घडणार आहे. तुमची साधना आता अधिक
Condensed आणि Concentrated होणार आहे. पूर्वीची साधना,
क्रिया, मुद्रा, आणि मंत्र सोडून आता नवीन साधना, क्रिया, मुद्रा, आणि मंत्र तुम्ही
सुरु करणार आहात. साधनेच्या या बदला बरोबरच तुमच्या जाणीवा-नेणिवेच्या कक्षा सुद्धा
कळत-नकळत बदलणार आहेत. उन्नत होणार आहेत. फार पाल्हाळ लावत बसत नाही पण साधनेचा हा नवीन टप्पा तुमच्यासाठी अधिक फलप्रद आणि प्रगतीकारक ठरणार
आहे हे नक्की. तुम्ही स्वतःच त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा हे उत्तम. त्यासाठी तुम्हाला विशेष रूपाने शिवसंकल्पपूर्वक खुप खुप शुभेच्छा.
असो.
आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने "ॐ नमः शिवाय" रुपी
षडाक्षर सदिच्छा व्यक्त करून लेखणीला
विराम देतो.