अजपा ध्यान आणि क्रिया ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अजपा ध्यानाचा संपूर्ण विधी, सखोल माहिती आणि गाईडेड मेडीटेशन सेशन्स.

त्र्यंबकेश्वरला दाखल

राजिनामा तर दिला. आता पुढे काय? एरवी चुटकीसरशी सरणारा दिवस आता आ वासून उभा होता. पहिले काही दिवस काहीच केले नाही. मनाला जरा विश्रांती दिली. त्यानंतर असे ठरवले की ज्योतिर्लिंगांना भेट द्यायची. या भेटीमागे माझे दोन हेतू होते. एक म्हणजे साधू, संन्यासी, बैरागी, योगी यांच्या जीवनाबद्दल असलेले कुतूहल शमवणे. अशा धार्मिक ठिकाणी त्यांच्याशी भेटता-बोलता येईल अशी माझी समजूत होती. दुसरे म्हणजे जरी मी माझ्या साधनेवर समाधानी असलो तरी एखाद्या अनुभवी साधकाला वा तज्ञाला माझी साधना दाखवावी, आपल्यासारखेच अनुभव त्यालाही आलेत का ते पहावे, असे वाटत होते. सुरवात अर्थातच महाराष्ट्रापासून करायची असे ठरवले. नाशिकच्या त्र्यंबकेश्वराबद्दल बरेच एकले होते. तेव्हा शुभारंभ त्र्यंबकेश्वरपासूनच करायचा असे ठरले. किती दिवस लागतील? पुढे कुठे व कसे जायचे? या प्रश्नांची उत्तरे माहीत नव्हती. प्रवास मोठा होण्याची शक्यता असल्याने तयारीसाठी दहा-पंधरा दिवस द्यावेत असे ठरवले.

या दहा-पंधरा दिवसांच्या काळात प्रवासाच्या तयारीबरोबरच शरीर-मनाचीही तयारी केली. हठयोगाच्या काही शुद्धीक्रियांचे आवर्तन करून घेतले. आता परत कधी येईन हे माहीत नव्हते, तेव्हा काही मित्रांच्या भेटी घेतल्या. उगाच गवगवा नको म्हणून त्यांना नोकरी सोडल्याचे वगैरे सांगितले नाही. अशाच एका संघ्याकाळची गोष्ट. काही मित्रांबरोबर गप्पा मारत बसलो होतो. करियर प्लानिंग, घराचे कर्ज, लग्न, सेटल होणे या विषयांभोवती त्यांच्या गप्पा घोटाळत होत्या. मला त्यात काहीसुद्धा रस नव्हता. तरी पण त्यांना वाईट वाटू नये म्हणून गप्पांत भाग घेतल्यासारखे दाखवत होतो. काही काळाने एकाला माझे लक्ष नाही हे कळलेच. मला बळेबळे गप्पांत ओढण्यासाठी तो म्हणाला - "काय कॉंप्युटर! (मी संगणक प्रेमी असल्याने काही मित्र मला कॉंंंप्युटर म्हणत असत) पुढे काय ठरवलेय? काय प्लॅन आहे पाच-सात वर्षांचा?" मी तंद्रीतच होतो. "मला योगी व्हायचेय", उत्स्फूर्तपणे शब्द बाहेर पडले.  त्यांच्या डोळ्यांतील "काय चक्रम आहे" हा भाव मला कळत होता. फार वेळ मी बसू शकलो नाही. काही कामाचे निमित्त सांगून मी त्यांचा निरोप घेतला. मनात विचार आला - आयुष्यात प्रत्येकजण काही ध्येय उराशी घेऊन धावत असतो. माझे ध्येय इतरांच्या ध्येयाशी विसंगत असले म्हणून काय झाले. परमेश्वराची इच्छा असेल तर मी माझ्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचीन.

करता करता त्र्यंबकेश्वरला जायचा दिवस उजाडला. सकाळची बस होती. प्रवासात मुद्दाम झोपलो, जेणेकरुन विचारांचे वादळ घोंगावणार नाही. गाडी नाशिकला पोहोचली. आहाराबद्दल मी अतिशय जागरूक आणि काटेकोर होतो. एका छोट्याशा हॉटेलमधे सुप व सॅलड खाल्ले. बाहेरचे अरबट-चरबट खाण्यापेक्षा हे बरे असा विचार केला. त्यानंतर दुसर्‍या बसने त्र्यंबकेश्वर गाठले. वाटेत अंजनेय पर्वताचे ओझरते दर्शन झाले. गोरक्षनाथांच्या गोष्टी आठवल्या. त्र्यंबकेश्वरला पोहोचल्यावर एका अनामिक भावनेने भरून आल्यासारखे वाटले. या जागेशी माझा पूर्वसंबंध आहे का? प्रथम दर्शनातच ही जागा एवढी आपलीशी का वाटतेय? मनाशीच आश्चर्य करत लॉज शोधण्याच्या मागे लागलो. फारशी अडचण आली नाही, पण त्यानंतरचा संध्याकाळपर्यंतचा वेळ सेटल होण्यात व थोड्या विश्रांतीत गेला. पाण्याच्या बाटल्या, संध्याकाळचे जेवण इत्यादींची सोय केल्यावर बाजारातून एक फेरफटका मारला. धार्मिक सामानांनी भरलेली अनेक दुकाने होती. भक्तांचा तोटा नव्हता. भारतातल्या कोणत्याही तीर्थक्षेत्रात गर्दी नाही असे कधीच नसते. मंदिरात डोकावले तर ही भलीमोठी रांग. त्या क्षणी रांगेत उभे राहण्याची ऊर्जा वाटेना. चौकशी केल्यावर कळले की पहाटे पहाटे गर्दी जरा कमी असते. तेव्हा दुसर्‍या दिवशी पहाटे दर्शन घ्यायचे ठरवले. उद्या नेहमीपेक्षा लवकर उठावे लागणार असा विचार करत लॉज गाठला. लॉजवाल्याशी घासाघीस करून सकाळी लवकर गरम पाणी मिळावे अशी व्यवस्था केली. आजची संध्याकाळची साधना या गडबडीत राहिली होती. ती आटपली व दिवा घालवला. उद्या येणारा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या दिवसांपैकी एक असणार होता याची पुसटशीही कल्पना त्या वेळी नव्हती.

वरील निवडक मजकूर बिपीन जोशी यांच्या देवाच्या डाव्या हाती या पुस्तकातून घेतलेला आहे. पुस्तकाचा उर्वरित भाग वाचण्यासाठी आपली प्रत आजच विकत घ्या. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.